Tuesday, June 29, 2010

आमच्याही भावना

एक मुलगा होता तो
निरागस, निर्मळ व स्वच्छंदी...
तसंच मोठं व्हायचं होतं त्याला.
पण शिक्षक म्हणाले,
जर शिकुन-सवरुन मोठं नव्हतं करायचं,
तर जन्माला का घातलंत त्याला?

एक जमिनीचा तुकडा होता तो
मऊ, भुसभुशीत, नुकताच नांगरलेला...
तसंच हवेशी हितगुज करायचं होतं त्याला.
पण शेतकरी म्हणाला,
जर त्यात पेरून शेत नसतं पिकवायचं,
तर कष्टाने नांगरलं का असतं त्याला?

एक कागद होता तो
पांढरा-शुभ्र नि कोरा-करकरीत...
तसंच निखळ रहायचं होतं त्याला.
पण लेखक म्हणाला,
जर लिहायचं नसतं त्यावर,
तर विकत का घेतलं असतं त्याला?

त्या मुलाला नव्हतं ठाऊक,
की मोठा होऊन, शिकून-सवरून, तो करणार आहे अनेक पराक्रम...
त्या जमिनीला नव्हतं ठाऊक,
की तिने पिकवलेल्या धान्याने भरणार आहेत कित्येक पोटं...
त्या कागदालाही नव्हतं माहिती,
की त्यावर लिहिलेलं काव्य देणार आहे कित्येकांना प्रेरणा...

माहिती असतं तर बरं झालं असतं ना!त्यांना आनंद झाला असता ना!

शिक्षक, शेतकरी नि कवी म्हणाले बघा,
घडवला कि नाही आम्ही इतिहास अपार!
पण त्यांना तरी कुठे होतं माहिती,
की इतिहास घडवताना त्यांनी केली वर्तमानाची शिकार?

माहिती असतं तर बरं झालं असतं का? त्यांना दुःख झालं असतं का?