Tuesday, January 4, 2011

स्वर्ग कुठे आहे? (विमानाच्या कंटाळवाण्या प्रवासात केलेली खरडपट्टी) :)

विमानातून बघताना खाली
ढगांची दिसतेय नरम ओढणी
पांढरीशुभ्र झिरझिरीत,
अगदी एखाद्या दालनाच्या पडद्यासारखी...

असं आकाशात फिरताना
मधूनच हा पडदा दूर होतो
आणि पडद्याखालच्या भूलोकाची
एक अदभुत झलक दाखवतो

वर आकाशात काय दिसतं आपल्याला?
दिवसा लख्ख सूर्यप्रकाश आणि ढगांचा पडदा
खालती मात्र दिसते रम्य दुनिया
सुंदर पर्वत, मोठाली राने, वळणदार नद्या...

काळी काळी माती नि तिला जोडून समुद्र विशाल
जेव्हा समुद्रात लाटा येतात जोरदार
वाटतं कि उडतोय निळा पदर,
आणि पदरावर आहे रेशमाची झालर बहारदार!

नागमोडी वळणे, लांब सरळ रस्ते दिसतात,
आणि सुबक घरं नि उंच इमारती
इवल्याश्या गाड्यांची भली मोठी रांग
बनवतात एक अप्रतीम कलाकृती...

संध्याकाळ होऊ लागताच आकाश बनतं लाल चुटूक अजब
आणि पिवळ्या केशरीच्या पळापळीत प्रकाशच होतो गायब!

मग खाली दिसते एक निराळीच दुनिया...
सोनेरी रंगात न्हायलेली,
लाल हिरव्या दिव्यांनी रंगीत झालेली
चमकदार वेलबुट्टीची शाल ल्यायलेली.

मैल अन मैल दूरवर, नजर घेऊन जाईल तिथवर
इतके दिसतात जमिनीवर दिवे सारे
चमचमत्या आकाशात सुद्धा
कधी पाहिले नसतील जितके तारे...

जमिनीच्या हजारो फूट वर आकाशात
विमानातून बघून आपल्याला वाटतं,
हे जे सर्व जमिनीवर दिसतंय,
ते अक्षरशः स्वर्गासारखच भासतं!

इतकं सुंदर, इतकं रम्य, इतकं देदीप्यमान,
अजून काय बर असू शकतं?

पण मग खुदकन हसून आपलंच मन आपल्याला सांगतं...
कि जमिनीवर राहत असताना, आपल्याला स्वर्ग आकाशात आहे असं वाटतं!

Tuesday, June 29, 2010

आमच्याही भावना

एक मुलगा होता तो
निरागस, निर्मळ व स्वच्छंदी...
तसंच मोठं व्हायचं होतं त्याला.
पण शिक्षक म्हणाले,
जर शिकुन-सवरुन मोठं नव्हतं करायचं,
तर जन्माला का घातलंत त्याला?

एक जमिनीचा तुकडा होता तो
मऊ, भुसभुशीत, नुकताच नांगरलेला...
तसंच हवेशी हितगुज करायचं होतं त्याला.
पण शेतकरी म्हणाला,
जर त्यात पेरून शेत नसतं पिकवायचं,
तर कष्टाने नांगरलं का असतं त्याला?

एक कागद होता तो
पांढरा-शुभ्र नि कोरा-करकरीत...
तसंच निखळ रहायचं होतं त्याला.
पण लेखक म्हणाला,
जर लिहायचं नसतं त्यावर,
तर विकत का घेतलं असतं त्याला?

त्या मुलाला नव्हतं ठाऊक,
की मोठा होऊन, शिकून-सवरून, तो करणार आहे अनेक पराक्रम...
त्या जमिनीला नव्हतं ठाऊक,
की तिने पिकवलेल्या धान्याने भरणार आहेत कित्येक पोटं...
त्या कागदालाही नव्हतं माहिती,
की त्यावर लिहिलेलं काव्य देणार आहे कित्येकांना प्रेरणा...

माहिती असतं तर बरं झालं असतं ना!त्यांना आनंद झाला असता ना!

शिक्षक, शेतकरी नि कवी म्हणाले बघा,
घडवला कि नाही आम्ही इतिहास अपार!
पण त्यांना तरी कुठे होतं माहिती,
की इतिहास घडवताना त्यांनी केली वर्तमानाची शिकार?

माहिती असतं तर बरं झालं असतं का? त्यांना दुःख झालं असतं का?

Monday, May 21, 2007

कविता लिहायचा प्रयत्न

लोकांना चारोळ्या कशा बरं सुचतात
शब्द नि ओळी कशा एकमेकांत गुंततात
 लोक छान छान कविता कशा बरे लिहितात
 सुबक आणि सुंदर कसे बरे यमक जुळवतात

मनात आलेली कल्पना कागदावर उतरते कशी
तीही अगदी रेखीव, जशी नक्षी मोरपिशी?
'त' ला 'त' जुळवताना आमची उडते भंबेरी
यांची मात्र ओळी, कडवी, नि गाण्यांवर हि मक्तेदारी!

का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
 का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
काहींच्या मनात प्रश्नच प्रश्न
नि काहींच्या वदनी सरस्वती वसते?