Tuesday, January 4, 2011

स्वर्ग कुठे आहे? (विमानाच्या कंटाळवाण्या प्रवासात केलेली खरडपट्टी) :)

विमानातून बघताना खाली
ढगांची दिसतेय नरम ओढणी
पांढरीशुभ्र झिरझिरीत,
अगदी एखाद्या दालनाच्या पडद्यासारखी...

असं आकाशात फिरताना
मधूनच हा पडदा दूर होतो
आणि पडद्याखालच्या भूलोकाची
एक अदभुत झलक दाखवतो

वर आकाशात काय दिसतं आपल्याला?
दिवसा लख्ख सूर्यप्रकाश आणि ढगांचा पडदा
खालती मात्र दिसते रम्य दुनिया
सुंदर पर्वत, मोठाली राने, वळणदार नद्या...

काळी काळी माती नि तिला जोडून समुद्र विशाल
जेव्हा समुद्रात लाटा येतात जोरदार
वाटतं कि उडतोय निळा पदर,
आणि पदरावर आहे रेशमाची झालर बहारदार!

नागमोडी वळणे, लांब सरळ रस्ते दिसतात,
आणि सुबक घरं नि उंच इमारती
इवल्याश्या गाड्यांची भली मोठी रांग
बनवतात एक अप्रतीम कलाकृती...

संध्याकाळ होऊ लागताच आकाश बनतं लाल चुटूक अजब
आणि पिवळ्या केशरीच्या पळापळीत प्रकाशच होतो गायब!

मग खाली दिसते एक निराळीच दुनिया...
सोनेरी रंगात न्हायलेली,
लाल हिरव्या दिव्यांनी रंगीत झालेली
चमकदार वेलबुट्टीची शाल ल्यायलेली.

मैल अन मैल दूरवर, नजर घेऊन जाईल तिथवर
इतके दिसतात जमिनीवर दिवे सारे
चमचमत्या आकाशात सुद्धा
कधी पाहिले नसतील जितके तारे...

जमिनीच्या हजारो फूट वर आकाशात
विमानातून बघून आपल्याला वाटतं,
हे जे सर्व जमिनीवर दिसतंय,
ते अक्षरशः स्वर्गासारखच भासतं!

इतकं सुंदर, इतकं रम्य, इतकं देदीप्यमान,
अजून काय बर असू शकतं?

पण मग खुदकन हसून आपलंच मन आपल्याला सांगतं...
कि जमिनीवर राहत असताना, आपल्याला स्वर्ग आकाशात आहे असं वाटतं!